Matoshree Kamalbai Vispute Mahila Vasatigruh 20th Vardhapan Din
आज ९ डिसेंबर,२०२० , मातोश्री कमलबाई विसपुते महिला वसतिगृहाचा २० वा वर्धापन दिन. आद. कै. बापूसाहेबांच्या प्रेरणेने दि. ९ डिसेंबर २००१ रोजी, (माजी लोकसभा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री महिला व बालकल्याण.) सन्माननीय श्रीमती सुमित्रा ताई महाजन यांच्या हस्ते नवीन पनवेल, येथील सेक्टर 15 मध्ये महिलांसाठी उभारलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले…प्रेमळ, संवेदनशील अशा आपल्या मातोश्री श्रीम. कमलबाई विसपुते यांचे नाव सदर वसतिगृहास देण्यात आले. १९ वर्षे मागे वळून पाहता कवितेच्या पुढील ओळी आठवतात.
” सागराने नाविका मनी
संकट मोठे पेरले, वादळाने होडीस एका
दहा दिशांनी घेरले . शीड तुटले, खीळ तुटले.
कथा काय या वल्ह्याची.
नाविकासही फिकीर नव्हती
पुढे राहिल्या पल्ल्याची” ….
खरोखरच उपरोक्त ओळी नुसार सन १९९८, मध्ये वसतिगृहाच्या अधिक्षिका. श्रीम. संगीता विसपुते यांना सभोवतालच्या परिसरातील विद्यार्थी, कर्मचारी, एकलकोंड्या महिलांच्या सुरक्षेच्या वादळाने घेरले. यासंदर्भात त्यांनी त्यांचे पती आदर्श शैक्षणिक समूहा चे अध्यक्ष आद. श्री धनराजजी विसपुते यांच्याशी विचार विनिमय करून अशा महिलांसाठी काहीतरी सोय करण्याचा निश्चय पक्का केला. उभयतांच्या प्रयत्नांनी ही नाव किनारी नेण्याचे ठरवले. बघता बघता कार्यालयीन , शासकीय बाबी पूर्ण होत गेल्या . सद्विचार मनी असल्यामुळे नियती सुद्धा साथ देत राहिली. .
महिलांचे सबलीकरण व्हावे यासाठी त्यांना मायेच्या आसऱ्याची नितांत गरज असते. सुरक्षितता ,स्वच्छता ,माया, प्रेम ,आपुलकी ,जिव्हाळा या सगळ्यांचीच आवश्यकता असते. सुरुवातीपासूनच या सगळ्या बाबींकडे काटेकोरपणाने लक्ष देऊन या वसतिगृहाचे निर्माण झाले . मागील एकोणीस वर्षाचा आढावा घेतला असता, वसतिगृहाच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे रोवण्यात आले. महाराष्ट्र शासनाचा पुण्यश्लोक अहिल्या अहिल्याबाई होळकर पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार, लेक लाडकी , झाशीची राणी अशा विविध पुरस्कारांचा मानकरी होण्याचा मान मिळाला आहे .
मैत्रिणींनो यश हे फक्त दिखाव्यावर अवलंबून नसते तर त्यासाठी कृतीही तितकीच महत्त्वाची असते. संकल्पना नुसत्याच कागदावर राहण्यापेक्षा त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे असते आणि हेच यशाचं खरं गमक असते. आज २०२० मध्ये जागतिक पातळीवर एवढे मोठे संकट आले असताना कित्येक वसतिगृहांना टाळेबंद व्हावे लागले ,परंतु कित्येक महिला पोलिस ,नर्सेस, डॉक्टर ,महिला कर्मचाऱ्यांच्या वास्तव्याचा विचार करता, या वसतिगृहाने टाळेबंदी च्या काळातही सदैव वसतिगृह सुरू ठेवले. या काळातही ४० च्या जवळपास महिला येथे वास्तव करीत होत्या . त्यांची सुरक्षितता ,परिसर स्वच्छता नियमांचे काटेकोर पालन तसेच त्यांच्या आहार व आरोग्याची योग्य ती काळजी घेत हे वसतिगृह खंबीरपणे महिलांच्या पाठीशी उभे आहे,याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे .